Latur News – शेतातील कॉपर वायर चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेणापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथे शेतातील काॅपर वायर चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मारहाण केली म्हणून मारहाण करणाऱ्या दोघांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेणापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खरोळा येथे शेतातील कॉपर वायर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलांना पकडण्यात आले. चोरी करताना पकडले म्हणून चोरट्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. मारहाण केल्याचे समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या प्रकरणात संबंधित तीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांच्यावर गु. र. न. 240/2026 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये चोरीसंदर्भातील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरीकडे संबंधित मुलांना मारहाण करून कायदा हातात घेतल्याप्रकरणी संबंधित तीन विधी संघर्ष बालक यांच्यापैकी एक जनाच्या फिर्यादीवरून सचिन नारायण राऊतराव वय (40) तसेच नितीन गोविंद शिंदे वय (38) यांच्यावर गु. र. न. 341/2026 कलम 118(1), 126 भारतीय न्याय संहिता अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे पोलीस स्टेशन रेणापुर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती व संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून शांतता व सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले.