
रिक्षा, टॅक्सी चालकांनी मराठी शिकावे असा आग्रह एकीकडे धरला जात असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रेल्वेत मात्र मराठीची गळचेपी सुरूच आहे. ‘मराठीत बोला’ असे सांगितले म्हणून रेल्वेच्या टीसींनी एका प्रवाशाला अंधेरी स्थानकातील कार्यालयात एक तास डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीने या प्रवाशाची सुटका केली.
तिकिटाची मागणी करणाऱ्या एका टीसीला संबंधित प्रवाशाने मराठीत संवाद साधण्याची विनंती केली. महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठीत बोला, असे तो म्हणाला. त्याचवेळी दुसरा एक मराठी टीसी धावून आला आणि तो प्रवाशालाच दमदाटी करू लागला. तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये मराठी आहे का? मोबाइलमध्ये हिंदी, इंग्रजी का वापरता, बाराखडी म्हणून दाखवा, असा उलट जाब विचारू लागला. या सर्व टीसींनी संबंधित प्रवाशाला तासभर कार्यालयात बसवून ठेवले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
बचावासाठी मराठी टीसीला पुढे केले!
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून पश्चिम रेल्वेवर मराठीद्वेषाचा आरोप केला आहे. अमराठी टीसींच्या बचावासाठी मराठी टीसीला पुढे करण्यात आले, असा आरोप देशमुख यांनी केलाटज्यांनी मराठी प्रवाशाला कैद करून ठेवले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
























































