
अर्जेंटिनाचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न आणि स्वित्झर्लंडच्या तब्बल 72 वर्षांनंतरच्या ऐतिहासिक उपांत्य फेरीच्या आशा यांचा संघर्ष शनिवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रंगणार आहे. लिओनेल मेस्सीच्या अनुभवाची कसोटी लागणार असून विजेत्या संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे.
अर्जेंटिनाचेच पारडे जड
सांख्यिकी विश्लेषणानुसार अर्जेंटिनाच्या विजयाची शक्यता 57.1 टक्के, तर स्वित्झर्लंडच्या विजयाची शक्यता 18.7 टक्के आहे. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची शक्यता 24.2 टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे. विश्वविजेतेपद टिकवण्याच्या ध्येयाने मैदानात उतरणाऱया अर्जेंटिनाला स्वित्झर्लंडकडून कडवे आव्हान मिळणार हे निश्चित समजले जात आहे.




























































