ज्येष्ठ गायिका एस. जानकी यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोल बेबी बोल रॉक अ‍ॅण्ड रोल, ओ मारिया, गोपाला-गोपाला अशी 20 भाषांमध्ये तब्बल 48 हजार अजरामर गाणी गाऊन रसिकांच्या मनावर सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या दाक्षिणात्य ज्येष्ठ गायिका एस. जानकी (88) यांचे आज मैसूर येथे निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गानकोकिळा अशी ख्याती असलेल्या एस. जानकी यांचा जन्म 23 एप्रिल 1938 साली आंध्रप्रदेश येथे झाला. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी आपले पहिले तमीळ गाणे रेकॉर्ड केले. मेरी जंग या हिंदी चित्रपटातील बोल बेबी बोल रॉक अॅण्ड रोल या गाण्यामुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली.

एस. जानकी यांची सर्वाधिक गाणी कन्नड, तमीळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये होती. त्यांना चार वेळा राष्ट्रीय तसेच 33 वेळा राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा केली होती, पण त्यांनी हा सन्मान नाकारला. हा सन्मान खूप उशिरा देण्यात आला आणि  दक्षिण भारतीय कलाकारांना त्यांचा योग्य हक्क मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.