
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आगाशिव डोंगरावर सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत मधमाश्यांच्या दंशामुळे, तसेच जीव वाचविण्यासाठी धावताना पडल्याने सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले. आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
जखमी विद्यार्थ्यांवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.
मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण, बीजारोपण आणि सीडबॉल प्रत्यारोपणासाठी आगाशिव डोंगरावर गेले होते. या उप्रकमात इयत्ता आठवी आणि नववीतील सुमारे 50 विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात विद्यार्थी सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण करत असताना अचानक मधमाश्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविल्याने मुलांची पळापळ सुरू झाली. या धावपळीत अनेक विद्यार्थी घसरून पडले, तर काहींना मधमाश्यांनी दंश केला. त्यामुळे सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि कर्मचाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केल्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.





























































