मोठी किंमत मोजावी लागणार! केश्म बेटासह इराणच्या 6 शहरांवर अमेरिकेचे भीषण हल्ले; होर्मुझची सामुद्रधुनी बंद, मालवाहू जहाजावरील हल्ल्यानंतर तणाव वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सायप्रसचा ध्वज असलेल्या एम/व्ही जीएफएस गॅलेक्सी या मालवाहू जहाजावर इराणकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रूमचे प्रचंड नुकसान झाले असून एक कर्मचारी बेपत्ता झाला आहे. या हल्ल्यानंतर जहाजाला भीषण आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी जहाज सोडून पळ काढल्याची माहिती ब्रिटिश लष्कराच्या युनायटेड किंगडम मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स केंद्राने दिली आहे. मालवाहू जहाजावरील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने शनिवारी पहाटे इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला.

इराणच्या प्रादेशिक समुद्री हद्दीत जाणे टाळण्यासाठी सायप्रसचा ध्वज असलेले मालवाहू जहाज ओमानच्या किनारपट्टीला लागून असलेल्या सुरक्षित मार्गावरून पर्शियन गल्फमध्ये ये-जा करत होते. मात्र, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या आंतरराष्ट्रीय मार्गावरच जहाजाला लक्ष्य केले, अशी माहिती ब्रिटीश लष्कराने दिली. या हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक हालचाल करत इराणच्या केश्म बेटासह 6 शहरांवर हवाई हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर शनिवारी पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी अमेरिकन सैन्या इराणमधील लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू केल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली.

इराणला किंमत मोजावी लागेल

सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इराणला यापूर्वी झालेल्या सागरी हल्ल्यांनंतर सुधारण्याची आणि कराराचे पालन करण्याची संधी देण्यात आली होती, परंतु ते पुन्हा अपयशी ठरले. व्यापारी जहाजे आणि आंतरराष्ट्रीय खलाशांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता नष्ट करण्यासाठी आणि त्यांना याची भारी किंमत मोजायला लावण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. तसेच इराणला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी दिला.

इराणमधील अनेक शहरांमध्ये प्रचंड स्फोट

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण इराण हादरला असून अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. जास्क या किनारपट्टीच्या शहरात 10 पेक्षा जास्त प्रचंड स्फोट झाले. बंदर अब्बासमध्ये 3 तर सिरीकमध्ये 2 मोठे स्फोट झाले. बुशेहर, असलुये आणि चाबहार या भागातही अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे भीषण स्फोट झाल्याची माहिती इराणच्या वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच केश्म बेटावरही हवाई हल्ले झाल्याचे वृत्त मेहर न्यूज एजन्सीने दिले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद

अमेरिकेच्या हल्ल्याच्या अवघ्या काही तास आधी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी सर्व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी बंद करत असल्याची घोषणा केली होती. एका जहाजाने अनधिकृत मार्ग वापरल्याचा ठपका ठेवत इराणने त्यावर चेतावणी देणारा गोळीबार केला होता आणि त्यानंतर हा मार्ग बंद केला. जोपर्यंत या भागातून अमेरिकेचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत कोणत्याही जहाजाला या मार्गावरून जाऊ दिले जाणार नाही, असे इराणने स्पष्ट केले.