
शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. मात्र भाजपचे पदाधिकारी चिडीचुप होते. सर्व थरातून टीका झाल्यानंतर सहा दिवसांनी भाजपच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट दिली. या लेटलतिफ भेटीमुळे रुग्णालय परिसरात भाजपचे ‘वरातीमागून घोडे’, अशी चर्चा रंगली होती.
शिंदे गटाच्या दादागिरीचा वैद्यकीय संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. मात्र स्थानिक आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेवर तत्काळ भूमिका न घेतल्याबद्दल डॉक्टर संघटनांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, शशिकांत कांबळे, दीपेश म्हात्रे, मोरेश्वर भोईर, मंदार टावरे यांच्यासह शिष्टमंडळाने रुग्णालयास भेट दिली.
आता पाठिंब्याचा काय उपयोग?
हल्ल्यानंतर आरोपीला अटक होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच भाजपचे शिष्टमंडळ रुग्णालयात दाखल झाले. वेळ निघून गेल्यानंतर दिलेल्या पाठिंब्याचा काय उपयोग? असे म्हणत काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.






























































