
चाविंद्रा येथील डंपिंग ग्राऊंडवर डंपर मागे घेताना एका चिमुकलीचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या केबिन कार्यालयाची तोडफोड केली तसेच डंपरही जाळून टाकला. शनाया हक (३) असे या मृत चिमुकलीचे नाव आहे.
रामनगर येथील महिला तिची तीन वर्षीय मुलगी शनाया हेला डंपिंग ग्राऊंडशेजारी एका गाळ्यात काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी शनाया रस्त्यालगत खेळत असताना चाविंद्रा रामनगर येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या डंपर चालकाने गाडी अचानक मागे घेतली. यावेळी मागच्या चाकाखाली चिरडून शनायाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी तिला तातडीने इंदिरा गांधी स्मृती जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी डंपिंग ग्राऊंडवरील कर्मचाऱ्यांच्या केबिन कार्यालयाची तोडफोड केली. फर्निचरही तोडून टाकले आणि शनायाला चिरडणारा डंपरही पेटवून दिला. यावेळी स्थानिकांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची व चिमुकलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































