उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; दरड कोसळल्याने केदारनाथ महामार्ग बंद, चारधाम यात्रेवर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रेवरही त्याचा परिणाम झाला आहे. सोनप्रयागजवळील मुनकटिया परिसरात दरड कोसळल्याने केदारनाथ महामार्ग तात्पुरता बंद झाला आहे.

महामार्गावरील माती आणि दगडांचा ढिगारा हटवण्यासाठी प्रशासनाने जेसीबीसह अन्य यंत्रसामग्री तैनात केली असून रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तसेच संवेदनशील ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) नंदन सिंह राजवार यांनी केदारनाथ यात्रा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. मुनकटिया परिसरातील रस्ता बंद असला तरी जेसीबीच्या सहाय्याने तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यात्रा मार्गावर सेक्टर अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथके सतत गस्त घालत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भाविकांना तातडीने मदत करण्यासाठी ते सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविक आणि स्थानिक नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचना व इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.