
बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकार जोडी ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ मधील संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नी सुनीला शर्मा यांचे रविवारी निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुनीला शर्मा यांनी नेहमीच पती प्यारेलाल यांच्या सांगीतिक प्रवासात आणि वैयक्तिक आयुष्यात खंबीर साथ दिली. त्या मूळच्या राणेबेन्नूर, कर्नाटकातील असून प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड आणि बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. सुनीला शर्मा अनेकदा प्यारेलालजींसोबत विविध जाहीर कार्यक्रमांमध्ये, संगीत मैफलींमध्ये आणि मुलाखतींमध्ये दिसत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायच्या. प्यारेलाल यांच्या स्वभावाचे आणि संगीतप्रेमाचे किस्से सांगायच्या. ‘इंडियन आयडॉल’, ‘सा रे ग म प’ यांसारख्या काही रिऑलिटी शोमध्ये पती प्यारेलाल यांच्यासोबत उपस्थित राहायच्या. नवोदित गायकांना प्रोत्साहित करायच्या. त्यांना मुलगा गौतम, मुलगी कनल अशी मुले आहेत.


























































