
मुक्ताईनगरहून पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी दोन दिवस बीडचा मुक्काम पूर्ण करून सोमवारी पहाटे पुढच्या प्रवासाला निघाली. हा प्रवास केवळ वारकरी परंपरेचा नाही तर रक्ताच्या नात्याचा आणि संस्काराचाही आहे. संत मुक्ताबाई यांनी सोमवारी बीड येथे असलेल्या आजोबा गोविंदपंतांच्या समाधीस्थळी जात आजोबांची भेट घेतली. भक्तीभावाची ही भेट भावस्पर्शी ठरली.
बीडच्या बिंदुसरा नदीच्या तिरावर संत मुक्ताबाई यांचे आजोबा गोविंदपंत यांची समाधी आहे. शेकडो वर्षांपासून गोविंदपंतांची ही समाधी इतिहासाची साक्ष देते. वारा, उन झेलत वर्षातून एकदा नातीच्या भेटीसाठी आजोबा उत्सुक असतात. सोमवारी नात मुक्ताबाई पंढरपूरच्या दिशेने निघण्यापूर्वी बिंदुसरा नदीच्या तिरावर असलेल्या आजोबा गोविंदपंतांच्या भेटीसाठी समाधीस्थळी दाखल झाल्या.
समाधीस्थळावर मुक्ताबाईंची पालखी पोहचताच टाळ, मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा, तुकारामाचा अखंड गजर आणि वारकर्यांच्या डोळ्यातील अश्रू या क्षणाने भारावून गेले. या भेटीनंतर मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. नातीच्या पाठोपाठ आजोबांचीही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. बीडमधील नात आणि आजोबांची ही भेट संस्कार आणि अध्यात्माचा संगम ठरते. यावर्षी या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































