मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सप्तलिंगी येथील जुन्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पुलाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाचे कठडे तुटले असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा पूल अपघाताला निमंत्रण देत असल्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग असला, तरी सध्या तो विकासापेक्षा निकृष्ट कामामुळे अधिक चर्चेत आहे. सिमेंटच्या रस्त्याला पडलेले तडे, ठिकठिकाणी समपातळी नसलेला रस्ता, नव्याने तयार झालेल्या खड्ड्यांची समस्या, अपुऱ्या नियोजनामुळे कोसळणाऱ्या दरडी, अपूर्ण गटारे आणि रखडलेले सेवा रस्ते यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी कामे अद्याप अपूर्ण असतानाच वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांच्या तक्रारींकडे कोणीच लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
सन 2014 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सप्तलिंगी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि नव्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा पूल प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली. मात्र, नव्या पुलासोबत असलेल्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्षित राहिली.
महामार्गावरील अनेक जुने पूल अद्याप वापरात असून त्यांचे वेळोवेळी नूतनीकरण आणि डागडुजी होणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.
सप्तलिंगी येथील जुन्या पुलाचे दोन्ही बाजूंचे कठडे तुटले आहेत. पुलाच्या खांबांवर झुडपे वाढली असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना वाहन बाजूला घ्यावे लागते. मात्र कठडे नसल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुलाच्या दोन्ही टोकांना रस्त्याची समपातळी नसल्याने वेगाने येणारी वाहने पुलावर आदळतात आणि वाहनांचे नुकसान होत आहे.
महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने अभियंते नियुक्त केले असले तरी आरवली ते बावनदी या टप्प्यात सर्वाधिक निकृष्ट काम झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कामाची गुणवत्ता राखण्यात संबंधित यंत्रणा अपयशी का ठरली, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांचा संताप वाढण्यापूर्वी कामातील त्रुटी दूर करून निकृष्ट दर्जाच्या कामाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सप्तलिंगी येथील जुन्या पुलाची राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती हाती घ्यावी. याशिवाय आरवली ते बावनदी या संपूर्ण टप्प्यातील कामाची केंद्रीय तज्ज्ञ समितीकडून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.
‘सप्तलिंगी पूल अपघाताला निमंत्रण’
सप्तलिंगी येथील जुना पूल सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला आहे. दोन्ही बाजूंचे कठडे तुटल्याने हा पूल राष्ट्रीय महामार्गाचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो. पुलाच्या खांबांवर झुडपे वाढली आहेत, तर दोन्ही बाजूंना रस्त्याची समपातळी नसल्याने वेगाने येणारी वाहने जोरात आदळतात. आरवली ते बावनदी या संपूर्ण पट्ट्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालवणे धोकादायक बनले असून, तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.



























































