चिपळूणच्या शिरवली-येलोंडेवाडी धरणाचे काम पूर्ण; पाच गावांतील शेतकऱ्यांना होणार फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील महत्त्वाकांक्षी शिरवली-येलोंडेवाडी धरण प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यामुळे परिसरातील पाच गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. 225 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या धरणामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

700 मीटर लांबी आणि 45 मीटर उंची असलेल्या या धरणाची 15.26 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या धरणात 3 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे सध्या धरणातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

या धरणाच्या पाण्याचा लाभ शिरवली, येलोंडेवाडी, देवखेरकी, नारदखेरकी आणि खरवते या पाच गावांतील शेतकऱ्यांना होणार असून, सिंचनासाठी वर्षभर पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पामुळे पावसाचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने साठवणे शक्य होणार असून, शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाला, फळबागा आणि नगदी पिकांच्या लागवडीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

धरणामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळीही वाढण्याची शक्यता आहे.

जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपूल खोत यांनी सांगितले की, या धरणातील पाण्यावर आधारित नळपाणी योजना राबविणे आता शक्य होणार आहे. तसेच टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेही अधिक सुलभ होईल.

या प्रकल्पासाठी 129 स्थानिकांनी स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारले आहे. धरणामुळे जलसंधारणाला चालना मिळणार असून, भविष्यात मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि इतर पूरक व्यवसायांमधून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.