
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ६३ किलोमीटर लांबीच्या कानपूर-लखनौ एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना गडकरींनी भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञानाविषयी मोठी घोषणा केली. “मी आगामी काळात अनेक नवीन तंत्रज्ञाने आणणार आहे. याआधी मी रोप-वे आणि केबल कार आणली. तसेच पाण्यात उतरणारे विमानही आणले होते, जे समुद्रात उतरले होते. आता मी लवकरच हवेत उडणारी बस आणणार आहे,” असे गडकरी म्हणाले. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ते म्हणाले की, यासाठी इलेक्ट्रिसिटीवर चालणारी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करत आहे. ज्यामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या वेगाने पोहोचता येईल की, त्यांना प्रवासाचा वेळही जाणवणार नाही. त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, नुकतेच उद्घाटन करण्यात आलेला कानपूर-लखनौ एक्सप्रेसवेवर वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १२० किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर दुचाकींना प्रवेश बंदी असून केवळ चारचाकी आणि मोठ्या वाहनांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे. उद्घाटनानंतर गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः कारने उन्नाव ते लखनौच्या सरोजनी नगरपर्यंत प्रवास करत या नव्या रस्त्याची चाचणी देखील घेतली.



























































