
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) महानगरपालिका क्षेत्रातील नाटय़गृहांच्या भाडय़ामध्ये दरवर्षी करण्यात येणारी भाडेवाढ पाच टक्क्यांऐवजी केवळ एक ते दोन टक्केच करण्यात येणार आहे. भाडेवाढीसाठी कोविडपूर्वीचा मूळ दरच विचारात घेतला जाणार असल्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अभिनेते प्रशांत दामले, निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाचे प्रतिनिधी, विविध महानगरपालिकांचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाटय़गृहांच्या वीज, देखभाल व दुरुस्तीवरील वाढत्या खर्चामुळे भाडेवाढ गरजेची असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र मराठी नाटय़सृष्टीचे हित आणि महापालिकांची आर्थिक स्थिती यामध्ये समतोल राखा, असे निर्देश शेलार यांनी दिले.
उत्पन्नवाढीसाठी विशेष समिती
नाटय़गृहांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी जाहिरात फलक आणि इतर उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढील तीन महिन्यांत विशेष समिती स्थापन करावी, असेही निर्देश शेलार यांनी दिले.
गोदामे, पार्किंगसाठी मानखुर्दचा पर्याय
दादर, परळ, लालबाग, शिवडी परिसरात नाटय़साहित्य, नेपथ्य आणि बस पार्किंगसाठी कायमस्वरूपी जागा देण्यात यावी, सध्याची जागा अपुरी असून अनेक वर्षांपासून गोडाऊन व वाहनतळाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पावसाळय़ात नेपथ्य साहित्याचे नुकसान होते तसेच गोडाऊन घेणे शक्य नसल्याने शासन किंवा महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर मानखुर्द येथे फिल्ससिटीला देण्यात येणाऱया जागांपैकी काही जागा गोदामे आणि पार्किंगसाठी देण्याचा विचार करावा, असे आशीष शेलार यांनी सांगितले.





























































