
सध्या शहरात गांजा व ड्रग विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांची झोप उडाली आहे. त्यातच आता भाजपची सत्ता असलेल्या पालिकेच्या उद्यानात चक्क गांजाची झाडे असल्याचा दावा नागरिकांनी केला. नागरिकांनी झाडाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने संपूर्ण शहरात ‘उद्यानात गांजाच्या शेती’ची चर्चा रंगली आहे. या प्रकरणी उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेच्या गजानननगर येथील सार्वजनिक उद्यानात गांजाची झाडे आढळल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी काही तरुण या उद्यानात नियमितपणे वावरत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लक्ष्मीनगरच्या झोन सभापती लक्ष्मी यादव यांनीही यास दुजोरा दिला. त्यांचे पुत्र करण यादव यांनी उद्यानाची पाहणी केल्यानंतर जॉगिंग ट्रॅकजवळील मोगऱ्याच्या झुडपांमध्ये अनेक संशयित गांजाची झाडे लपवून ठेवण्यात आल्याचा दावा केला.
…तर कारणे दाखवा नोटीस बजावणार
उद्यान विभागाचे उपायुक्त गणेश राठोड यांनी प्रसारित चित्रफितीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणीदरम्यान आक्षेपार्ह बाबी आढळल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल आणि नियमानुसार कारवाई केली जाईल, असे राठोड यांनी सांगितले.




























































