
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा औषध भांडार कुचकामी असल्याचे समोर आले असून याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या १२ औषधांपैकी एकही औषध शासकीय मेडिकल मध्ये उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मुलाच्या पालकांनी ८५० रुपयांची पदरमोड करून बाहेरून औषधे विकत घेतली. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट महापौरांकडे तक्रार केली आहे.
टिटवाळा येथील रहिवासी जगदीश राठोड यांचा दोन वर्षांचा मुलगा वेदांत राठोड याला त्वचेचा त्रास, खाज आणि अंगावर पुरळ येण्याची समस्या निर्माण झाली होती. उपचारासाठी त्यांनी मुलाला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून वेदांतसाठी १२ प्रकारची औषधे लिहून दिली आणि ती रुग्णालय परिसरातील शासकीय मेडिकलमधून मोफत घेण्याचा सल्ला दिला. मात्र मेडिकल काऊंटरवर गेल्यानंतर राठोड यांना मोठा धक्का बसला. कर्मचाऱ्यांनी औषधांची चिठ्ठी पाहून यापैकी एकही औषध सध्या उपलब्ध नाही. सर्व औषधे बाहेरील खासगी मेडिकलमधून घ्यावी लागतील असे सांगितले. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राठोड कुटुंबाला तब्बल ८५० रुपयांची औषधे खासगी मेडिकलमधून खरेदी करावी लागली. या घटनेनंतर जगदीश राठोड यांनी थेट महापौर हर्षाली थवील यांच्याकडे धाव घेत तक्रार केली.
उपचारासाठी नेमके कुठे जायचे?
शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांचीही भेट घेऊन त्यांनी औषधटंचाईबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी डॉ. पिंजारी यांनी रुग्णालयातील काही औषधांचा साठा संपल्याची कबुली देत अद्याप नवीन औषधांचा पुरवठा झालेला नसल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेनंतर संतप्त झालेल्या जगदीश राठोड यांनी पालिकेच्या रुग्णालयात गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना साधी औषधेही मिळत नसतील तर उपचारासाठी नेमके कुठे जायचे, जर ८५० रुपयांचा खर्च परवडणारा असता तर आम्ही खासगी रुग्णालयातच उपचार केले असते, असा संतप्त सवाल उपस्थित केला.




























































