ठाण्यातील रिंग मेट्रो कोळीवाड्याच्या मुळावर; मंदिर, विहिरी, पारंपरिक घरे, गावठाणे बाधित होण्याची भीती, गावकऱ्यांचा कडाडून विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्तुळाकार रिंग मेट्रो प्रकल्प ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्याच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. २९.१ किमी लांब धावणारी ही मेट्रो या भागात भूमिगत असणार असून गावठाण्यातील अनेक मंदिरे, विहिरी, जुनी घरे बाधित होणार आहेत. त्यामुळे कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक रचनेलाच तडा जाणार असल्याने कोळीबांधवांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.

ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी शहरांतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात येत आहे. मात्र उभा राहणाऱ्या या प्रकल्पास पर्यावरणतज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच या प्रकल्पाचा तीन किलोमीटरचा मार्ग भूमिगत असून तो चेंदणी कोळीवाड्यातून जाणार आहे. कोळीवाड्याचे सीमांकन झाले नसताना हा प्रकल्प राबविला जात आहे. या भूमिगत मार्गामुळे येथील वारसास्थळ असलेले मंदिर, विहिरी, भूजल स्तर, पारंपरिक घरे आणि गावठाणाची सामाजिक-सांस्कृतिक परिसंस्थाच बाधित होणार असल्याची भीती कोळीबांधवांनी व्यक्त केली आहे.

सीमांकन नाही तोपर्यंत प्रकल्प राबवू नका

गेल्या तीन महिन्यांत अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कोळीवाडा ही वसाहत सर्वात जुनी असून येथे खरे भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या प्रकल्पाबाबत कोळी बांधवांमध्ये अनेक शंका आहेत. त्यानुसार चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, भाजप आमदार संजय केळकर आणि संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. जोपर्यंत सीमांकन होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

जुने ठाणे उद्ध्वस्त होणार

ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प हा १२ हजार २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे. २९.१ किमी लांबीच्या या मार्गावर २२ स्थानके असणार आहेत. त्यापैकी २० उन्नत आणि २ भूमिगत असणार आहेत. हा प्रकल्प कोपरी ते वागळे इस्टेट, कोलशेत, बाळकूम आणि घोडबंदरमार्गे पुन्हा ठाणे स्थानकाला जोडला जाणार आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे जुने ठाणे उद्ध्वस्त होणार असल्याने रिंग मेट्रो प्रकल्प चांगलाच वादात सापडला आहे.