सुनेत्रा पवार यांना न सांगताच तटकरे-पटेल फडणवीसांना भेटले! कोअर कमिटी बैठकीत पक्षाध्यक्षांनी विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कोणतीही कल्पनाच दिली नव्हती. यामुळे नाराज झालेल्या सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावून तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे यांना तुम्ही नेमकी कशासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली? याबाबतची माहिती आपल्याला का देण्यात आली नाही?, अशी विचारणा करत परस्पर फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर तटकरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले. राज्यातील राजकीय घडामोडी आणि भविष्यातील प्रशासकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आवश्यक होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमागील कारण काहीही असले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वकल्पना देणे अपेक्षित असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही – तटकरे

सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीकरता ज्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे, ती माहिती आम्ही नियमितपणे त्यांना सांगत असतो. आमचा संवाद अतिशय उत्तम आहे. आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही, अशी सारवासारव सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.