
शेतकऱ्यांवर असलेली जुनी वीज बिलाची 48 हजार कोटींची थकबाकी माफ केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे महाघोटाळा असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. उद्योगांतील वीज चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारली गेली आहे, असा दावा करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांवर 48 हजार कोटींची वीज थकबाकी होती, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला नवा शोधच आहे. इतर क्षेत्रांमध्ये होणाऱ्या वीज चोरीचा हिशेब लागत नसल्याने, ती चोरी लपवण्यासाठी उरलेली सर्व वीज शेतकऱ्यांनी वापरल्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले जाते, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर मूळ थकबाकी 7 ते 8 हजार कोटी रुपयेच होती. महावितरणने त्यावर 18 टक्के चक्रवाढ व्याज आकारून तो आकडा 48 हजार कोटींवर नेऊन ठेवला आहे. 40 हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग 1 लाख 10 हजार कोटींवर न्यायचा आणि त्यातून पैसे काढायचे, तसेच 48 हजार कोटींची बिले माफी दाखवून त्यातून अॅडजस्टमेंट करायची असे कारस्थान असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
मोफत विजेसाठी घेतलेल्या सोलर पॅनेल खरेदीतही घोटाळा
शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र त्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सोलर पॅनेल्सची खरी किंमत किती आहे आणि ते महावितरण व महाजनकोच्या माध्यमातून नेमके किती रुपयांना खरेदी केले गेले, याची चौकशी केल्यास खरा घोटाळा समोर येईल. त्यासाठी या खरेदीची आणि वीज बिल माफीच्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.



























































