
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनियमितता व लिंकिंगचे प्रकार आढळून आल्याने जिल्ह्यातील 46 कृषी परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱयांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथक यांच्यामार्फत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये त्रुटी तसेच नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले आहेत. त्यासोबतच पूर्ण तपासणी करून विविध निविष्ठांचे नमुने काढणे, खतविक्री व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खते विक्री, खतांची लिंकिंग, असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषी निविष्ठा विक्री कायद्यानुसार कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत.
युरिया खताची वाढती मागणी व युरिया विक्रीमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराच्या तक्रारी कृषी विभागास प्राप्त झालेल्या होत्या. त्या रोखण्यासाठी तसेच ‘ई-पॉस’वरील खतसाठा व गोदामातील प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून येत होती. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरात झालेल्या तपासणीत विविध कृषी सेवा केंद्रांच्या 46 परवान्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अकोल्यातील 2, शेवगाव 8, संगमनेर 3, नेवासा 1, कर्जत 3, कोपरगाव 3 व नगर 4 अशा कृषी सेवा केंद्रांच्या 24 रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक परवान्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संबंधितांची सुनावणी घेऊन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात आले. तसेच अहिल्यानगर तालुक्यात कायमस्वरूपी बंद असणारे 21 व श्रीरामपूरमधील 1 कृषी सेवा केंद्रांच्या रासायनिक खतांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.





























































