
सरकारी नोकरी मिळवण्याचे वारंवार प्रयत्न करूनही अपयश आल्यामुळे बी.टेक सुवर्णपदक विजेत्याने जीवन संपवलं. आनंद असे मयत तरुणाचे नाव आहे. आनंदने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आनंदने वडिलांची माफी मागणारी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आनंदने 2024 मध्ये ‘पीएसआयटी’ (PSIT) या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) केले होते. आनंदने बी.टेकमध्ये अव्वल स्थान पटकावत उत्तर प्रदेशात तिसरा क्रमांक मिळवला होता. 13 ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयातील एका कार्यक्रमात त्याला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदचे कुटुंब त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाचे नियोजन करण्यासाठी बिहारला गेले होते. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने घरातील मदतनीसाने शेजारी आणि पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, आनंद त्याच्या खोलीतील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिथे त्याला हाताने लिहिलेली पाच ओळींची चिठ्ठीही सापडली.
“माफ करा बाबा, मी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जवळपास 50 वेळा प्रयत्न केले, पण मला यश आले नाही. कृपया मला माफ करा”, असे चिट्ठीत लिहिले होते. पोलिसांनी आनंदचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर भैरव घाट येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राथमिक तपासावरून सरकारी नोकरी न मिळाल्यामुळे आनंद तणावाखाली होता, असे दिसून येते. तरीही, या प्रकरणाच्या सर्व बाजूने तपासणी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.





























































