
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना लोटला असला तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४५ हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत. प्रशासनाने गणवेशाचा प्रस्ताव उशिरा महासभेत मांडल्यानंतर हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महासभेने जुन्याच ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही गणवेश वेळेत तयार न झाल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. गणवेशासह अन्य शालेय साहित्य, रेनकोटचेही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेले नाही. नववी, दहावी, बालवाडी आणि सीबीएसई शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहारही टेंडरच्या वादात अडकला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात चालवल्या जात असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुमारे ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश, शालेय साहित्य, पीटी आणि स्काऊटचा गणवेश, बूट, मोजे, दप्तर, वह्या आणि रेनकोटचे वाटप केले जाते. प्रत्येक वर्षी या वस्तू विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नाहीत. यंदाही प्रशासनाने गणवेश आणि अन्य साहित्य देण्यास कमालीचा विलंब केला आहे. शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिलारे यांनी १५ जुलैपर्यंत गणवेशांचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल, असे सांगितले होते. मात्र ही डेडलाइन हुकल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
टेंडरसाठी पाच वर्षांचा कालावधी
ज्या कामांमधून फायदा होत आहे त्या कामांसाठी पाच वर्षांचा कालावधी दिला जात आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या कामांची मुदतवाढ फक्त वर्षभरासाठी दिली जाते हे फार मोठे दुर्दैव आहे. शाळा सुरू होऊन महिना लोटला तरी गणवेश मिळालेले नाही. धो धो पाऊस सुरू असताना विद्यार्थ्यांना रेनकोट दिले जात नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केली आहे.
– नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करण्याचे काम शहरातील बचत गटांना देण्यात येणार होते. मात्र हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जुन्याच मफतलाल या ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्याने वेळेत काम पूर्ण केलेले नाही. प्रशासनाने दिलेली डेडलाइन आता संपली आहे. येत्या आठ दिवसांत जर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
– नवी मुंबई महापालिका शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. नववी, दहावी, बालवाडी आणि सीबीएसई शाळांतील १८ हजार विद्यार्थ्यांना महापालिका पोषण आहाराचा पुरवठा करते. या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट संपले आहे. त्यामुळे या १८ हजार विद्यार्थ्यांना उपाशीपोटी शिक्षण





























































