रात्री शांत झोप लागत नसल्यास, कोणत्या सवयी अंगिकारायला हव्यात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बदलती जीवनशैली, कामाचा ताण, उशिरापर्यंत मोबाईलचा वापर आणि अनियमित दिनचर्या यामुळे अनेकांना रात्री सहज झोप लागत नाही किंवा वारंवार जाग येते. ही समस्या वारंवार होत असल्यास दुर्लक्ष न करता काही सोप्या सवयी अंगीकारल्यास गाढ आणि शांत झोप मिळण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी खोलीतील प्रकाश मंद ठेवावा आणि मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीनपासून दूर राहावे. दररोज ठरावीक वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे जैविक घड्याळ (बॉडी क्लॉक) संतुलित राहते.

 

अनेकांना अंथरूणावर पडल्यानंतरही झोप न येण्याची समस्या उद्भवते. रात्रीची झोप न झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो. अशावेळी झोप लवकर येण्यासाठी 4-7-8 श्वसन तंत्र ही उपयुक्त ठरू शकते. यामध्ये चार सेकंद श्वास घेणे, सात सेकंद रोखून धरणे आणि आठ सेकंद हळूहळू श्वास सोडणे याचा समावेश आहे. याशिवाय ध्यानधारणा (Meditation) आणि प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशनमुळे शरीर व मन शांत होण्यास मदत होते.

 

सुमारे 20 मिनिटांनंतरही झोप येत नसेल तर अंथरुणावर पडून राहण्याऐवजी एखादे हलके पुस्तक वाचावे. खोलीचे तापमान आरामदायी ठेवणे, आवाज टाळणे आणि नियमित व्यायाम करणेही फायदेशीर ठरते. मात्र, झोपण्यापूर्वी जड व्यायाम टाळावा.

 

झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये, जड व मसालेदार अन्न तसेच मोबाईलचा अतिवापर टाळावा. दीर्घकाळ झोपेचा त्रास, दिवसभर थकवा, चिडचिड किंवा घोरणे व श्वास अडखळण्यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.