
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र अमली पदार्थांचा हब बनत चालला आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या पाच महिन्यांतच राज्यात सुमारे 7 हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 411 कोटी रुपये आहे. या प्रकरणांमध्ये 6 हजारांवर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात 21 परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे आकडेवारी सांगते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आणि कारवायांबाबतचे सादरीकरण करण्यात आले. 2022 ते 2026 या पाच वर्षांचा आढावा त्यात घेण्यात आला. त्यात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षीचा पहिल्या पाच महिन्यांतील घटनांचा आकडा चिंताजनक असला तरी अमली पदार्थविरोधी पोलिसांच्या कारवाया अधिक तीव्र झाल्याची खात्री देणारा आहे.
परदेशी गुन्हेगारांचा समावेश
गेल्या पाच वर्षांतील अमली पदार्थांसंदर्भातील घटनांमध्ये अटक झालेल्या आरोपींमध्ये परदेशी लोकांची संख्याही पूर्वीपेक्षा मोठी दिसून येते. 2022मध्ये अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी 61 आरोपी परदेशी नागरिक होते. हाच आकडा 2023मध्ये 73, 2024मध्ये 58, 2025मध्ये 72 आणि 2026मध्ये पहिल्या पाच महिन्यांत 21 असा आहे.
हेरॉईन, एमडीचे सेवन सर्वाधिक
हेरॉईन आणि एमडी या अमली पदार्थांची विक्री आणि सेवन अधिक प्रमाणात होते. 2021 ते 2025 या पाच वर्षांत 9582.77 कोटी रुपयांचे अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेने जप्त केले. त्यात एमडीचे प्रमाण सर्वांधिक 5.7 टन इतके होते. त्याची किंमत 6550.43 कोटी रुपये होती तर 484.75 कोटी रुपयांचे हेरॉईन होते. इतर जप्त अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, कोकेनचा समावेश होता.
वर्ष घटना जप्ती अटक
2023 15478 43632 किलो 16105
2024 15873 43814 किलो 14230
2025 17611 56206 किलो 15994
2026 6933 15458 किलो 6303





























































