हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली, मालाड येथील चार पर्यटक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरिश्चंद्र गडावर रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. पावसाची झिमझिम चालू असताना मालाड येथील दहा पर्यटक हरिश्चंद्र गडावरून खाली उतरत असताना आडव्या कडय़ाच्या मागील बाजूस पर्यटकांच्या अंगावर दगड व माती पडून चार पर्यटक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यातील दोन पर्यटक मातीच्या व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते.

पर्यटकांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या रेलिंगमुळे पर्यटकांना आधार मिळाला. सोबत असलेल्या पर्यटकांनी व तेथे उपस्थित असलेल्या अमोल बादड या ग्रामस्थाने या अपघाताबाबतची माहिती तत्काळ गावात व वन्यजीव विभागाला दिली.

 

घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन पर्यटकांच्या मदतीने माती व दगडाखालून पर्यटकांना बाहेर काढले व लगेच उचलून पायथ्याशी आणून खासगी गाडीने पर्यटकांना राजूर दवाखान्यात पाठवले.

 

दवाखान्यात डॉ. अभिनव लहामटे यांनी प्रथम उपचार करून या जखमी पर्यटकांना नाशिक येथे हलवण्याचा सल्ला दिला. चार जखमींमध्ये राम प्रकाश यादव, नीलेश गोमाटी, विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू, दिनेश संजय साहू यांचा समावेश असून, त्यापैकी तीनजणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

घटनेचे वृत्त कळताच, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे, लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.