
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांमध्ये दमदार पाऊस पडला आहे. परिणामी मागील दोन दिवसांपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे मुंबई शहर व पश्चिम उपनगरांतील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरण्याकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.





























































