सांगली महापालिकेच्या महासभेत भाजपकडून उपमहापौरांचा अवमान; सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई यांनी महासभेतच उपमहापौरांचा अवमान केल्याने सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अर्धा तास जुंपली. विरोधी पक्ष काँग्रेसने राष्ट्रवादीची बाजू उचलून धरल्याने सत्ताधाऱयांमध्ये चांगलाच वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसकडे धाव घेत नवलाई यांनी माफी मागावी, अन्यथा सभात्याग करण्याचा इशारा दिला. अखेर महापौरांच्या सांगण्यावरून नवलाई यांनी उपमहापौरांबद्दल बोललेले शब्द माघार घेत वादावर पडदा टाकला.

 

महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ शौचालय मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात नवीन सामुदायिक शौचालय बसविण्यासाठी ठिकाण निश्चित करण्याचा विषय महासभेत आला होता. भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई मत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता, उपमहापौर गजानन मगदूम यांनी ‘खाली बसा दुसरे बोलू देत,’ असे सांगितले. त्यामुळे नवलाई यांनी उपमहापौरांना ‘तुम्ही बोलू नका,’ असे सुनावले. यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आक्रमक होत उपमहापौर यांच्या पदाचा अवमान झाल्याने नवलाई यांनी माफी मागावी, अशी भूमिका घेतली.

 

मैनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, करण जामदार यांच्यासह महिला सदस्या आक्रमक झाल्या. त्यांनी महापौरांच्या डायसकडे जात नवलाई यांनी माफी मागावी; अन्यथा राष्ट्रवादीचे सदस्य सभात्याग करतील, असा इशारा दिला. भाजपच्या नगरसेवकांनी नवलाई यांची बाजू घेतली. ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने आले. महापौर धीरज सूर्यवंशी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, संजय मेंढे यांनी उपमहापौरांची बाजू उचलून धरली. उपमहापौरांचा अवमान करणाऱयांनी माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या सुरात सूर ओढला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांना अधिक जोर चढला.

 

राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दीन बागवान व लक्ष्मण नवलाई यांच्यात वादावादी झाली. भाजपचे सदस्य निरंजन आवटी, संतोष पाटील व प्रकाश मुळके यांनी राष्ट्रवादीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण राष्ट्रवादीच्या आक्रमक नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी कायम ठेवली. अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेतील पटलावरील नवलाई यांचे शब्द काढून घेत उपमहापौर व नवलाई यांच्यातील गैरसमज दोघांनी दूर करावेत, अशा सूचना दिल्या. त्यानंतर लक्ष्मण नवलाई यांनी, ‘माझ्या शब्दामुळे राग आला असेल तर शब्द माघार घेतो,’ असे सांगितले. त्यानंतर वाद मिटला.

 

काँग्रेसला गुदगुल्या; सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला

उपमहापौरांचा अवमान केल्याने राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपचे लक्ष्मण नवलाई यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना गुदगुल्या झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीची बाजू रेटून धरली. विरोधी पक्ष काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीचा वापर फक्त संख्याबळासाठी भाजप करीत आहे. तुम्ही सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला दिला. पण राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आम्ही सक्षम आहोत, असा पलटवार केला.