
माद्रिद : स्पेनच्या जगज्जेतेपदानंतर माद्रिद, बार्सिलोना, व्हॅलेन्सिया, सेव्हिया या शहरांत रात्रभर जल्लोष सुरू होता. हजारो चाहते लाल-पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. मेट्रो स्थानकांपासून चौकांपर्यंत एकच घोषणा घुमत होती ‘ला रोजा… राजा!’ तो जल्लोष सकाळीच नव्हे, तर दुपारी कायम होता. कारण दुपारी त्यांचा वर्ल्ड चॅम्प आपल्या मातृभूमीवर अवतरणार होता.
ब्युनोस आयर्सचे अश्रू
ब्युनोस आयर्स : जगज्जेतेपद राखण्यात अपयश आल्यानंतर अर्जेंटिनात निराशेचे वातावरण पसरले. ब्युनोस आयर्सपासून कॉरदोबा, रोझारियोसारख्या शहरांमध्ये हजारो चाहते मोठ्या स्क्रीनसमोर शांत बसले होते. शेवटच्या शिट्टीनंतर काही ठिकाणी टाळय़ा वाजल्या, कारण संघ हरला तरी लढत हरला नव्हता. मेस्सीचे पोस्टर हातात घेऊन अनेक चाहत्यांनी त्याला सलाम केला.
अमेरिका म्हणाली, पुन्हा या!
न्यूयॉर्प : 40 दिवस चाललेल्या स्पर्धेने अमेरिकेतील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना दिली. हॉटेल्स,
रेस्टॉरंट्स, टॅक्सी, स्मृतिचिन्हांच्या दुकानांनी विक्रमी उलाढाल केली. न्यूयॉर्प, मियामी, लॉस एंजेलिस आणि डलास येथे लाखो परदेशी चाहत्यांनी गर्दी केली. स्पर्धा संपली, पण अनेक शहरांमध्ये अजूनही फुटबॉल फॅन झोन पर्यटकांनी गजबजलेले आहेत.
लामिन यमालचा नवा दरबार
बार्सिलोना : या वर्ल्ड कपने स्पेनला केवळ ट्रॉफी दिली नाही, तर लामिन यमालच्या रूपाने पुढच्या दशकाचा सुपरस्टार दिला. अंतिम सामन्यानंतर त्याची जर्सी, पोस्टर आणि स्वाक्षरी मिळवण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागल्या. एका वर्ल्ड कपने एका किशोरवयीन मुलाला राष्ट्रीय आयकॉन बनवले.
मेस्सीचा पराभव… प्रेमाचा विजय
न्यूयॉर्प : स्पेनने ट्रॉफी जिंकली, पण स्टेडियममधून बाहेर पडताना सर्वाधिक घोषणाबाजी झाली ती मेस्सीच्या नावाची. अर्जेंटिनाचा पराभव झाला तरी हजारो स्पॅनिश चाहत्यांनीही उभे राहून त्याला टाळ्यांची मानवंदना दिली. ट्रॉफी हरली, पण मनं जिंकण्याचा विक्रम पुन्हा मेस्सीच्याच नावावर राहिला.





























































