कोथिंबीर-पुदिना वारंवार खराब होत असल्यास या सोप्या टिप्सचा वापर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथिंबीर आणि पुदिना हे आपल्या स्वयंपाकातील महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्ही पदार्थ भाज्यांची चव वाढण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. मात्र बाजारातून आणल्यानंतर काही दिवसांतच कोथिंबीर आणि पुदीना कोमेजतो. मुख्य म्हणजे कोथिंबीर आणि पुदीना काळे पडणे किंवा सडणे ही अनेक घरांतील सामान्य समस्या आहे. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास हे दोन्ही पदार्थ अधिक काळ ताजे राहू शकतात आणि वारंवार खरेदी करण्याची गरजही भासत नाही.

 

तज्ज्ञांच्या मते, कोथिंबीर आणि पुदिन्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ओलावा, हवेशी संपर्क आणि चुकीची साठवणूक यामुळे ते लवकर खराब होतात. त्यामुळे साठवण्यापूर्वी पिवळी किंवा खराब पाने वेगळी काढावीत. धुतल्यास ती पूर्णपणे कोरडी करूनच फ्रिजमध्ये ठेवावीत. पेपर टॉवेलमध्ये हलक्या हाताने गुंडाळून एअरटाइट डब्यात किंवा झिप-लॉक पिशवीत ठेवल्यास त्यांचा ताजेपणा अधिक काळ टिकतो. देठ थोड्या पाण्यात ठेवून त्यावर सैल प्लास्टिक पिशवी घालण्याची पद्धतही उपयुक्त ठरते.

 

साठवणुकीदरम्यान पेपर टॉवेल वेळोवेळी बदलणे, गरजेपुरतीच पाने बाहेर काढणे आणि उर्वरित पुन्हा फ्रिजमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. ओल्या अवस्थेत बंद डब्यात ठेवणे, सडलेली पाने इतर पानांमध्ये ठेवणे किंवा सफरचंद, केळी यांसारख्या एथिलीन वायू सोडणाऱ्या फळांच्या जवळ ठेवणे टाळावे. पाने पिवळी, काळी किंवा चिकट होऊ लागली अथवा त्यातून दुर्गंधी येऊ लागली तर ती खराब झाल्याचे समजावे. योग्य काळजी घेतल्यास कोथिंबीर आणि पुदिना अनेक दिवस ताजे आणि सुगंधी राहू शकतात.