शिक्षणमंत्र्यांसह पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; जोरदार मागणी करत राहुल आणि प्रियांका गांधी यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. NEET पेपरफुटी, स्पर्धापरीक्षांमधील गोंधळ याबाबतचा मुद्दा उचलून धरत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांबाबत जाब विचारण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे कूच केले आहे. सरकारला याप्रकरणी कोणतीही जबाबदारी स्वीकारायची नाही किंवा संसदेत यावर चर्चाही करायची नाही. देशातील तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. यानंतर, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन केले. शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांचे आंदोलन पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर सुरू आहे.