पाच दिवस पावसाचे! कोकण, मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बसरत आहेत. आता मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 21 जुलै ते 26 जुलै याकाळात कोकण ,गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सध्या गुजरात किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 21 ते 25 जुलै दरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर कायम राहणार आहेत. त्यामुळे कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ही पावसाचा जोर वाढणार असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.

22 जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर जिल्ह्यांसह नाशिक सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 23 जुलै रोजी तळ कोकणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून जळगाव,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. 24 जुलै रोजी ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा घाटमाथा व गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 25 जुलै रोजी रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर गेलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील 2 ते 3 दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो.