
नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. काल संसदेबाहेर लाखो तरूण आंदोलक जमले असताना त्यांच्यावर केलेला अमानुष अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. तरूणांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारमंच बुधवारी रत्नागिरीत मोर्चा काढणार आहे, अशी माहिती अभिजीत हेगशेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले की, जंतरमंतर येथे सोनम वागचुंग आणि अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने पोलीस पाठवून सोनम वागचुंग यांना ज्या पद्धतीने उचलून नेले, ते निषेधार्ह आहे. काल संसद भवनाबाहेर लाखो तरूण आंदोलन करत असताना त्यांच्यावर करण्यात आलेला अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. तरूणांच्या या देशव्यापी आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत बुधवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरीत मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी,अशोक भाटकर, राजू जाधव, बाळ कचरे इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























































