
मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढणाऱया तरुणांचा आवाज आणखी बुलंद झाला. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट दिल्लीत दाखल झाले. जंतरमंतरवर जाऊन त्यांनी अभिजित दीपके यांच्यासह अन्य आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या हिमतीला दाद दिली. ‘तुम्ही या देशाचे भविष्य आहात. वेळ बदलत राहते. ही वेळही जाणार आहे. त्यामुळे घाबरू नका. लढा… ही ठिणगी विझणार नाही, आम्ही ती विझू देणार नाही. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे,’ असा शब्द उद्धव ठाकरे यांनी जेन-झी आंदोलकांना दिला.
‘नीट’सह केंद्रीय परीक्षांतील पेपर फुटीविरोधात तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाचा वणवा देशभरात पेटला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवसेनेने मुंबईत विराट मोर्चा काढला होता. त्याचवेळी दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आज रात्री साडेदहा वाजता उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत पोहोचताच ते थेट जंतरमंतर येथील आंदोलन स्थळी पोहोचले. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई यावेळी उपस्थित होते.
तरुणांनी मोबाइलच्या फ्लॅश लाइट लावून उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. त्यामुळे अवघे वातावरण भारून गेले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी हाताला धरून उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर नेले. व्यासपीठावर आल्यानंतर उपस्थित तरुणाईला अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक वाक्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
‘इथे यावे लागेल असे मला वाटले नव्हते. सरकार आपले आहे, काहीतरी तोडगा निघेल असे वाटत होते. तसे झाले नाही. पण देशाच्या भविष्यावर लाठय़ा चालवणारे सरकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.’ मी इथे भाषण द्यायला आलो नसून युवा शक्तीला नमन करायला आलो आहे. हिंमत देण्यासाठी आणि हिंमत घेण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.
एक व्यक्ती बदलून चालणार नाही!
‘सरकारच्या कारभारामुळे आज अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यांचे फोटो इथे आहेत. हे बलिदान आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. आता फक्त सुरुवात झाली आहे. आता एक व्यक्ती बदलून चालणार नाही. संपूर्ण व्यवस्था बदलायला हवी. त्यासाठी दिल्लीत पाय रोवून उभे राहा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. अभिजितने काल एका गुंडाचा फोटो व्हायरल केला आहे. हे करायलाच हवे. हे लोक जाणार कुठे? आज ते खुर्चीवर बसले असतील, पण उद्या त्याच खुर्चीत इथल्या तरुणांपैकी कोणीतरी बसेल, तेव्हा त्यांना बघून घेऊ,’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
आज दिल्लीत पत्रकार परिषद
विद्यार्थी आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि अन्य विषयांवर उद्धव ठाकरे हे बुधवारी सविस्तर भूमिका मांडणार आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे.
जखमींची विचारपूस केली!
उद्धव ठाकरे यांनी अभिजित दीपके व त्यांच्या सहकाऱयांशी चर्चा केली. संसदेवरील मोर्चाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या अत्याचारात जखमी झालेल्या तरुण-तरुणींची उद्धव ठाकरे यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
वन नेशन… वन इमोशन
‘काही लोक धर्माच्या भिंती बांधून देशाचे तुकडे करू इच्छित होते. या भिंती पडल्या आहेत. आज देशाची भावना एकच आहे. ‘वन नेशन, वन इमोशन’ झाले आहे. या एकाच भावनेसह आम्ही तुमच्यासोबत आहोत. शेवटपर्यंत राहू, लढत राहू,’ अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.





























































