
जेन-झी आंदोलकांवरील सरकारी अत्याचाराविरोधात आज राजधानी दिल्लीत प्रचंड उद्रेक झाला. हजारो तरुणांबरोबर विरोधी पक्षांचे खासदारही रस्त्यावर उतरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी थेट पंतप्रधान मोदींच्या घराला घेराव घातला. फक्त धर्मेंद्र प्रधानच नव्हे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी मोदींच्या घराबाहेर ठिय्याच दिला. पोलिसांनी या खासदारांची धरपकड करत त्यांना बळजबरीने उचलून व्हॅनमध्ये कोंबले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी पकडले. या दडपशाहीमुळे वातावरण कमालीचे चिघळले आहे. दरम्यान, तीन तासांनंतर रात्री राहुल गांधी यांची सुटका करण्यात आली.
केंद्रीय परीक्षांतील पेपरफुटी व त्यानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढला. शांततेत निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. तरुणांची डोकी फोडली, कपडे फाडले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री व खासदारांनी पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्गावरील घरावर मोर्चा काढला. मोदी आणि भाजप सरकारविरोधी घोषणा दिल्या.
पंतप्रधानांच्या घराबाहेरील आंदोलनात सर्व देशभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल यांनी एक्सच्या माध्यमातून केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे राहुल यांच्या भेटीला गेले व आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. मात्र, राहुल यांनी नकार दिला. ‘नीट’सह विविध परीक्षांच्या मुद्दय़ांवर संसदेत चर्चा करा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, असे म्हणत धरणे आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
तीन तासांनंतर सुटका
पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करणारे राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांना पोलिसांनी सायंकाळी 6 वाजता उचलून नेले. पुरुष खासदारांना छत्रसाल स्टेडियम येथे ठेवण्यात आले. त्यांना सुमारे 3 तासांनी पावणे दहा वाजताच्या आसपास सोडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार संसदेत चर्चेसाठी तयार नव्हते, असा आरोप काँग्रेस खासदारांनी यावेळी केला.
संसदेत गदारोळ
विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी कामकाज सुरु होताच प्रचंड गदारोळ घातला. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहबूक करण्यात आले. अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेत काही तासांचे कामकाज झाले. मात्र, दुपारच्या सत्रात विरोधकांनी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर राज्यसभा दिसभरासाठी तहकूब करण्यात आली.
लाठीचार्जमध्ये जखमी झालेली विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर
दिल्लीत सोमवारी संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी एका 21 वर्षीय विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या आरएमएल रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असून ती विद्यार्थिनी व्हेटिंलेटरवर असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.
मुलींच्या छातीवर पाय ठेवून मारले
अभिजित दीपके यांनी कालच्या आंदोलनावरील लाठीमार हा देशावरील काळा ठपका असल्याची टीका केली. 12 वर्षांच्या लहान मुलींची डोकी फोडली, त्यांना मारहाण झाली. पुरुष पोलिसांनी कपडे फाडून त्यांच्या छातीवर पाय ठेवून मारले, असे ते म्हणाले.
देशभरात पडसाद, विरोधक एकवटले
हल्ल्याचे तीव्र पडसाद आज देशभरात उमटले. सरकारविरोधात तमाम विरोधी पक्ष एकवटले. देशात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये शहीद दिनानिमित्त तृणमूल काँग्रेसने काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. गरज पडल्यास मी स्वतः दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी होईन, असे त्यांनी सांगितले. सपाने दिल्ली, उत्तर प्रदेशात आंदोलन केले.
शेतकऱ्यांपुढे सरकारची माघार
हिंदुस्थान-अमेरिकेतील व्यापार कराराच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱयांनी पुकारलेले आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले. ‘देश वाचवा’ अशी हाक देत शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीकडे निघाले होते. सकाळपासूनच शंभू, कुंडली आणि खनौरी सीमेवर जथेच्या जथे धडकले. हरयाणा सरकारने शेतकऱयांच्या दोन मोठ्या मागण्या मान्य केल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकरी नेत्यांची सुटका व केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठकीची शेतकऱयांची मागणी हरयाणा सरकारने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जंतरमंतरवर गर्दी वाढली!
जंतरमंतरवर गर्दी वाढतच आहे. आजही हजारो तरुण-तरुणी ठाण मांडून होते. घोषणा देत, विडंबनात्मक गाणी म्हणत सरकारचा धिक्कार सुरूच आहे. तरुणाईच्या रोषाचा फटका मोदी सरकारची तळी उचलणाऱया वृत्तवाहिन्यांनाही बसला. त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांवरील हल्ला हा देशातील प्रत्येक कुटुंबावरचा हल्ला आहे. आपल्याला या सगळ्यातून सहज निसटता येईल असे मोदींना वाटत असेल, पण यावेळी असं होणार नाही. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ देणार नाही. – राहुल गांधी





























































