
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ-संशोधक सोनम वांगचुक आणि कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यभरात आंदोलनाचा अक्षरशः वणवा पेटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रविवारी शिवसेनेच्या आंदोलनात असंतोषाची पहिली ठिणगी पडली. यानंतर आता काँग्रेस, ‘मनसे’, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीसह अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले आहे.
शिवसेनेच्या रविवारी झालेल्या आंदोलनानंतर अजूनही शिवतीर्थ आणि चैत्यभूमी येथे आंदोलक विद्यार्थी ठाण मांडून बसले आहेत. या ठिकाणी आज ‘मनसे’ नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चेंबूरमध्येही आज आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. कल्याण, अंबरनाथ, खोपोली, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मनसे उद्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहे.





























































