‘एनडीआरएफ’ला पुण्यात तीन हेक्टर जमीन, मंत्रिमंडळ निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता. मावळ) येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन देण्यास आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

ही जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यावर या संस्थेने जनहित तथा राष्ट्रीय महत्त्व या कारणास्तव संस्थेस ही जमीन विनामूल्य मिळावी, अशी मागणी केली होती. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार आहे. जिथे आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह, विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची पृतीदले तैनात राहणार आहेत.

लोकायुक्त कार्यालयात 143 पदे

लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आपृतीबंधास मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि  उपलोकायुक्त  कार्यालयांसाठी यापूर्वी 87 पदांचा आपृतीबंध मंजूर करण्यात आला होता. आता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर लोकायुक्त संस्थेतील सदस्यांमध्ये वाढ केली असून त्यांच्या अधिकार क्षेत्रातही वाढ झाली आहे. त्यामुळे  सध्याची मंजूर पदे 87 अधिकची 56 पदे अशा एपूण 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली.

आकांक्षित तालुका कार्यक्रम

राज्यातील 10 जिल्ह्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये 2026-27 या वर्षासाठी  आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली असून त्यांना वर्षासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.गडचिरोली, नंदूरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तसेच तालुके म्हणून निवड केली आहे.

काटोलमध्ये शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्याशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. दरवर्षी या महाविद्यालयात 120 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. एकूण 51 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.