आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच चर्चा; मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी, विरोधकांनी संसद दणाणून सोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनामध्ये विरोधक आक्रमक होत आहेत. बुधवारीही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. आधी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, मगच आम्ही चर्चा करू, अशी मागणी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करत संसद दणाणून सोडली. यामुळे राज्यसभेचे कामकाज 3 वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

नीट-युजी परीक्षेतील गोंधळ आणि जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत विरोधकांनी सभागृहात जोरदार निदर्शने केली. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृहात नीट किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होऊ दिली जाणार नाही. निष्पक्ष चर्चेसाठी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आवश्यक आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सभागृहातील वाढता गदारोळ आणि घोषणाबाजी पाहून सभापतींनी राज्यसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

विरोधकांचे काळ्या कपड्यात आंदोलन

दरम्यान, बुधवारी सकाळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून संसद परिसरात सरकारविरोधात निदर्शने केली. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.

“शांततापूर्ण आंदोलन करणे ही लोकशाही, परंतु…”

देशाचे शिक्षण बजेट 1.4 लाख कोटी रुपये आहे, परंतु दुसरीकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत आणि ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणे ही लोकशाही आहे, परंतु विद्यार्थी आणि संसदेबाबत सरकार जे करत आहे ते पूर्णपणे अलोकतांत्रिक आहे, असे यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या.

शेवटपर्यंत लढत राहील! – खरगे

हे सरकार लोकशाही मार्गाने चालत नसून हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. नियमानुसार आंदोलन करणाऱ्या खासदारांचाही ते सन्मान करत नाहीत. पोलिसांच्या वेशात आंदोलनकर्त्यांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही, आमचा संघर्ष असाच सुरू राहील. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा सरकारला पश्चात्ताप करावा लागेल. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी शेवटपर्यंत लढत राहील, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.