
चीनमधील शांघाय शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रायगडची कन्या चार्वी कोलवणकर हिने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. चार्वी ही सध्या पुणे शहरात राहते. तिचे मूळ गाव तळा असून आजोळ महाड तालुक्यात आहे. लहान वयात मिळालेल्या या यशामुळे जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय पातळीवर अनेक जिम्नॅस्टिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार्वी कोलवणकर (९) हिची निवड चीनमधील शांघाय शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी झाली. इतक्या लहान वयात तिला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. या स्पर्धेसाठी 15 जुलै रोजी बुधवारी शांघायच्या दिशेने रवाना झाली. तिने या स्पर्धेत चार सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेत जगभरातील सुमारे ७०० क्रीडापटू सहभागी झाले होते.
जगभरातील या गुणवंत खेळाडूंमध्ये चार्वीने 5 प्रत्येक प्रकारात उत्कृष्ट संतुलन, लवचीकता, ताकद आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चार्वीने चार सुवर्ण पदकांची कमाई केल्यानंतर जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिचे वडील अभिजित कोलवणकर आणि आई नीलम कोलवणकर यांचेही विविध सामाजिक संस्थांनी अभिनंदन केले आहे.
कोरोनाचा काळ टर्निंग पॉईंट ठरला
चार्वीला बालपणापासून जिम्नॅस्टीकची आवड होती हे पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्याभोवती तसे वातावरण तयार केले. कोरोना काळात हे कुटुंब पुण्यातून आपल्या गावी रायगड जिल्ह्यात आले. चार्वीने या ठिकाणी झाडावर चढणे, वडाच्या पारंब्यांना लोंबकळणे, डबल बारवर लटकणे हे व्यायामाचे प्रकार सुरू केले. हाच काळ तिच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला, अशी प्रतिक्रिया तिच्या पालकांनी व्यक्त केली आहे.




























































