हुकुमशहाचं हे सरकार कुणाला घाबरतंय? विद्यार्थ्यांना पाठवलेल्या नोटीसीवरून आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनानंतर अनेक विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले. त्यानंतर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत सर्व विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल होत आहे, अनेकांना नोटीस बजावल्या जात आहे. अनेकांना सरकारविरोधाती आंदोलनाचे अपलोड केलेले व्हिडीओ, रिल्स डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर बोलताना शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. हुकुमशहाचं हे सरकार कुणाला घाबरतंय असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना डिलीट करायला लावण्यात आलेले व्हिडीओ, रिल्स सेव्ह करून ठेवा, कुणाला घाबरू नका, आपण ते पुन्हा अपलोड करू; असे आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्री निवास्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. ”धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तेव्हा सरकारने कॉक्रोच जनता पार्टीला सर्वांवरील एफआयआर मागे घेण्याचं वचन दिलं होतं. 20 तारखेला दिल्लीत लाठीचार्ज झाल्यानंतर उत्स्फुर्तपणे तरुणाई बाहेर पडली. त्यानंतरच्या आंदोलनात अनेकांवर एफआयआर झाल्या, अनेकांना नोटीस बजावल्या. काहींना डिटेंशनमध्ये ठेवलं. त्यात काही अल्पवयीन होते. अनेकांना आम्ही जाऊन सोडवलं होतं. तरिही नोटीसी पडत होत्या. मुख्यमंत्र्यांनी सर्व एफआयआर मागे घ्यायचे आदेश द्यायला हवे होते. आमच्या इमेल आयडीवर तुमच्या नोटीसी पाठवा. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या केसेस विनामूल्य लढू. तसेच वकिलांना आम्ही आव्हान करतो की ज्यांना या केसेस लढायच्या आहेत त्यांनी पुढे या” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”NEET पेपरफुटीसाठी एवढं मोठं आंदोलन करावं लागंल. त्या आंदोलनावर पेलेट गन, AK 47, खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी लाठीचार्ज झाला. पण जे विद्यार्थी नीटचा पेपर देऊन डॉक्टर झाले. त्या कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला जामीन देण्याच्या मागे सरकार उत्सुक आहे. नशिबाने न्यायालय सध्या कडकपणे चांगली भूमिका घेत आहे. डॉक्टर बनलात तरी मार खाताय आणि डॉक्टरांसाठी लढलात तरी तुमच्यावर केसेस टाकतायत. भाजपची ही राजवटच विद्यार्थी व युवा विरोधी आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”MHCET स्कॅम बद्दल मुख्यमंत्र्याचं कुठेही भाष्य ऐकलेलं नाही. नांदडेमधील भाऊ बहिणीचं बारावीतले मार्क बघा आणि आता CET चे मार्क बघा. हे सगळे भाजपशी निगडीत लोकं आहेत. यांना HSC मध्ये कमी व CET मध्ये हे पुढे येतात. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवं. उद्यापासून अॅडमिशन होणार आहेत. यात अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. पंजाबबद्दल जेव्हा अरविंद केजरीवाल यांना विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे काय झालं ते सांगितलं व जबाबदारी घेतली. तसंच काय पाऊलं उचललं ते देखील सांगितलं. तसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”लाठीचार्ज कुणी करायला सांगितला हे कुणाला माहित नाही, दिल्लीतून आदेश आले की इथल्या गृहमंत्र्यांनी दिले ते माहित नाही. नागपूरमधील आमच्या युवतीला कसं फरफटत नेलं. तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा आजुबाजुला सर्व पुरुष पोलीस होते. एका महिलेच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. असा लाठीचार्ज करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

”याच आंदोलनातील अनेक रिल्स बनले आहेत, ते रिल्स नोटीसा पाठवून काढायला सांगितले जात आहेत. कुणाला घाबरतंय हे सरकार? कुणाची एवढी भिती तुमच्या मनामध्ये? जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी परिस्थिती आली नसती. ज्यांनी हुकुमशहाला झुकवलं त्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्याच्या मागे लागले आहेत. तरुणांने आता या हुकुमशहाला घाबरायचं नाही. तुमचे रिल्स व्हिडीओ सेव्ह करून ठेवा आपण पुन्हा ते अपलोड करू”, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

”महाराष्ट्रातल्या पोलीस दलाची आम्ही सर्वात जास्त बाजू घेत असतो. पोलिसांशी संबंधित कुठलाही विषय आम्ही सभागृहात मांडतो. पण त्या फोर्समधल्या काही ठराविक लोकांनी अमानुष लाठीचार्ज केला असेल, तरुण मुलांचे करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

CET मध्ये घोटाळा असेल तर मुख्यमंत्री बोलणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते स्वायत्त आहे. असंच त्यांनी NTA बद्दलही सांगितलं होतं तसंच आता CET चं बोलतायत. आता यात मुख्यमंत्री पण सामिल आहेत का? त्यांना एवढ्या लाख तरुणांचे करिअर बर्बाद करायचे आहेत का? भाजपशी संबंधित काही विद्यार्थ्यांची बाजू घेणार आहेत का? यावर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण आलं पाहिजे” असे ते म्हणाले.