
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ सभेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या मंचावरून जनतेला संबोधित केले, त्या मंचाचे हिंदू संघटनांकडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून खरगे यांनी राज्यसभेत संताप व्यक्त केला आहे. तसेच हा माझा अपमान आहे त्या लोकांनी मला अस्पृश्यतेची जाणीव करून दिली. त्यासाठी त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी राज्यसभेत केली आहे.
”मला हा राजकीय मुद्दा बनवायचा नाही. मी कधीही कोणाला असं म्हटलं नाही की मी दलित आहे, माझं रक्षण करा, किंवा मी कोणासमोरही कधीच गयावया केली नाही. माझ्यात लढण्याची ताकद आहे आणि मी लढतो.पण हल्द्वानी येथे मंचाचं शुद्धीकरण करून मला अस्पृश्यतेची (Untouchability) जाणीव करून दिली गेली आणि माझा अपमान केला गेला, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
”हल्द्वानीमध्ये ज्या लोकांनी मंचाचं शुद्धीकरण केलं, त्यांच्यावर अस्पृश्यता कायद्यांतर्गत (Untouchability Act) गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात यावं.” अशी मागणी खरगे यांनी राज्यसभेत केली.
८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उत्तराखंडच्या काँग्रेस प्रभारी कुमारी सेलजा तसेच विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. सभेनंतर ‘श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्ट’ या हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी सभेच्या मंचाचे शुद्धीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी वैदिक मंत्रोच्चारांसह पूजा आणि यज्ञ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खरगे यांनी भाषण केलेल्या मंचावरच हा विधी करण्यात आल्याने या प्रकारावरून काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.





























































