हिंदुस्थानी मुलाकडून अमेरिकेत आई आणि भावाची हत्या; आरोपीला पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाच्या किशोरवयीन मुलाने अमेरिकेत आई आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम तीव्र करत बुधवारी पहाटे आरोपीला अटक केली. अर्जुन अरविंद असे आरोपीचे नाव आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅक्टन-बॉक्सबरो रिजनल हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या अरविंदने मंगळवारी मार्था लेनवरील राहत्या घरी आईवर आणि लहान भावावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आईच्या होंडा अकॉर्ड कारमधून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खासगी शिक्षिका ठरल्या वेळेत घरी आली तेव्हा घटना उघडकीस आली.

शिक्षिकेने अनेकदा बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. यामुळे तिने अर्जुनच्या वडिलांना फोन केला. वडिलांनीही फोनवरून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी अ‍ॅक्टन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता अर्जुनची आई सुधा वेंकटेशन आणि भाऊ सिद्धार्थ मृत अवस्थेत आढळले. वेंकटेशन यांचा मृतदेह घराच्या तळघरात तर सिद्धार्थचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर आढळला.

दोघांच्या शरीरावर जखमा होत्या. मात्र हत्येचे कारण आणि कशी केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असता अरविंद आणि त्याच्या आईची ‘होंडा अकॉर्ड’ कार बेपत्ता असल्याचे आढळून आले. तपासकर्त्यांनी अरविंदचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरुवातीला त्यांना यश आले नाही. अखेर रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर बुधवारी पहाटे मॅसॅच्युसेट्समधील वेलँड येथे एका पार्किंग लॉटमध्ये गाडी आणि त्यात अरविंद सापडला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

अर्जुनवर आई सुधा वेंकटेशन आणि भाऊ सिद्धार्थ अरविंद यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अर्जुनवर हत्येचे दोन गुन्हे, कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याचे दोन गुन्हे, तसेच विनापरवाना वाहन वापरणे आणि मोटार वाहन चोरणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याला प्रौढांसाठीच्या न्यायालयात (अडल्ट कोर्ट) हजर केले जाण्याची शक्यता आहे.