
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या ठाण्यातील २४ उमेदवारांना ३ वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेबच दिलेला नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश काढले असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक होते. परंतु निवडणूक अधिकारी यांच्या अहवालानुसार २४ उमेदवारांनी वेळेत खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना आपली बाजू मांडण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणीची संधी देण्यात आली होती. सुनावणीदरम्यान काहींनी उपस्थिती दर्शवली तर काही अनुपस्थित राहिले. दरम्यान दिलेल्या मुदतीत हिशेब सादर न केल्यामुळे या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे व तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
६० दिवसांच्या आत आयोगाकडे अर्जाची मुभा
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश देत संबंधित २४ उमेदवारांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे. निवडणूक बंदीचा हा आदेश आजपासून लागू राहील. उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष अर्ज दाखल करण्याची मुभा आहे.
अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त
फेब्रुवारी महिन्यात ६१ उमेदवारांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. १५ दिवसांत निवडणूक खर्चाचा हिशेब द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला होता. त्या ६१ उमेदवारांना पालिका प्रशासनाने शेवटचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ३७उमेदवारांनी निवडणुकीचा हिशेब दिला. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. मात्र हिशेब न देणाऱ्या २४ अपक्ष उमेदवारांना आता तीन वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही.





























































