महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवरून रोहित पवार आक्रमक; ‘बंगाल पॅटर्न’चा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात कोणतीही मोठी निवडणूक तोंडावर नसताना SIR प्रक्रिया एवढ्या घाईघाईने का राबवली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

SIR प्रक्रियेसाठी 17 ऑगस्ट ही अंतिम मुदत असताना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकार आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी पश्चिम बंगालमधील SIR प्रक्रियेचा संदर्भ देत महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतिम मुदतीला आता केवळ चार दिवस शिल्लक असताना सुमारे 18 टक्के मतदारांची प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “पश्चिम बंगालमध्येही 12 टक्के म्हणजेच 91 लाख मतदारांची नावे वगळून लोकशाहीचा ज्याप्रमाणे गळा घोटला, तोच बंगाल पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवून मतदारांचा हक्क हिरावून घेऊन सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील उपलब्ध आकडेवारीनुसार, 18 टक्के मतदारांची प्रपत्र अद्याप जमा झालेली नाहीत असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, पुरेशी संधी आणि वेळ दिल्याशिवाय कोणत्याही मतदाराचा लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगासह कुणालाही नाही. सरकार पुरस्कृत हा कट आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने मुदतवाढ द्यावी. प्रसंगी स्वतःच्या यंत्रणेमार्फतही खात्री करावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

तसेच SIR प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, अद्याप आयोगाकडून वेळ देण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. “आम्ही अजूनही वाट पाहत आहोत,” असेही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.