हिंदुस्थानच्या खेळाडूंचा पदक ‘पंच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी तलवारबाजांनी राष्ट्रकुल फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी तब्बल तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले. हिंदुस्थानीं खेळाडूंनी वरिष्ठ वैयक्तिक स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एपूण पाच पदके पटकावली. त्यामुळे स्पर्धेतील हिंदुस्थानच्या एपूण पदकांची संख्या 29 वर पोहोचली असून, त्यात आठ सुवर्ण, सात रौप्य आणि 14 कांस्यपदकांचा समावेश आहे.

महिला फॉइलमध्ये हिंदुस्थानचे वर्चस्व

वरिष्ठ महिला फॉइल प्रकारात हिंदुस्थानने अक्षरशः मैदान गाजवले. कनागलक्ष्मीने अचूक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर कब्जा केला. तिची सहकारीजॉयस अशिताने रौप्यपदक पटकावले. हिंदुस्थानी खेळाडूंनी इंग्लंडच्या जॉर्जिया ग्रीन आणि एमिली गुडचाइल्ड यांना मागे टाकत पोडियमवरील पहिले दोन क्रमांक आपल्याकडे खेचून आणले.

पुरुष एपीमध्ये शेरजिनचा सुवर्णवार

वरिष्ठ पुरुष एपी प्रकारातही हिंदुस्थानी तलवारीची धार कायम राहिली. राजेंद्रन शांतिमोली शेरजिनने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर पीटरचा पराभव केला. पीटरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वेल्सचा बर्पहार्ट मार्प आणि दक्षिण आफ्रिकेचा लोसेव्स्की सर्गेई यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

सेबरमध्ये करण सिंहचा तिसरा सुवर्णवार

दिवसातील तिसरे सुवर्णपदक करण सिंहने हिंदुस्थानच्या खात्यात जमा केले. वरिष्ठ पुरुष सेबरच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या शिम यूंगीचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. शिम यूंगीला रौप्यपदक मिळाले. हिंदुस्थानच्या पुमारेशन पद्मा गिशो निधीने नायजेरियाच्या अकिन्योसोये ओलुवापह्लायेमीसह कांस्यपदकाची विभागणी केली.

29 पदकांसह हिंदुस्थानची झेप

स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांतच हिंदुस्थानने आठ सुवर्ण, सात रौप्य आणि 14 कांस्य अशी तब्बल 29 पदके आपल्या नावावर केली आहेत. हिंदुस्थानी फेन्सिंगपटूंच्या या दमदार कामगिरीमुळे पदकतालिकेत हिंदुस्थानची स्थिती भक्कम झाली आहे. आता फॉइल, एपी आणि सेबरच्या सांघिक स्पर्धांच्या अंतिम लढतींकडे हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे. वैयक्तिक स्पर्धांतील सुवर्णधडाका सांघिक लढतींतही कायम ठेवत लागोसमध्ये हिंदुस्थानला विजयी मोहोर उमटवण्याची संधी आहे.