
विलेपार्ले पश्चिम येथील शांता भवन इमारतीच्या 11व्या मजल्यावर मंगळवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटने आग लागून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जणांना मृत्यू झाला.
बाप्टिस्टा रोडवरील शांता भवन इमारतीच्या 11व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1101 आणि 1102मध्ये मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. काही क्षणांत ही आग पूर्ण मजल्यावर पसरली. घरातील केअरटेकर कपड्यांना इस्त्री करताना शॉर्ट सर्किट झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. आग घराच्या हॉलमध्ये लागली. तिथून ती घरभर पसरली. घरात आग लागलेली केअरटेकरला समजले नव्हते. ती बेडरूममध्ये बाळासोबत होती. बेडरूममधून दार उघडून बाहेर येताच तिला धूर दिसला. जीव वाचवण्यासाठी ती बाळाला घेऊन बेडरूमच्या टॉयलेटमध्ये गेली. मात्र धुरामुळे तिचा आणि बाळाचा श्वास कोंडला आणि मृत्यू झाला.
आगीत घरातील विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणे, एसी युनिट, घरातील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री 12.25 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, तर रात्री 1 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. या दुर्घटनेत आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना कूपर रुग्णालयात, तर सहा जणांना नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. नानावटी रुग्णालयात अडीच वर्षांचा अबीर आणि 23 वर्षीय अंकिता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पार्थ (32) आणि हिरन (64) यांची प्रकृती स्थिर आहे. यशस्वी (33) आणि अभिषेक यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलेले अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे (30) आणि शिवम द्विवेदी (29) यांनाही उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.






























































