वरळी पोलीस कॅम्पच्या पुनर्विकासात निवृत्त पोलिसांनाही घरे द्या! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी पोलीस कॅम्पच्या पुनर्विकासात निवृत्त पोलिसांनाही घरे देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि पोलिसांच्या घरांबाबत उच्चस्तरीय बैठक लवकरात लवकर बोलवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पावसाळी अधिवेशनात 10 जुलै रोजी विधानसभेत विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील पोलिसांच्या घरांबाबत एका आठवडय़ात मोठा निर्णय जाहीर करू असे सांगितले होते. मात्र त्या घोषणेला एक महिना उलटला तरी अद्याप कोणतीही घोषणा सरकारकडून झालेली नाही किंवा यासंदर्भात बैठक झाल्याची माहितीही नाही, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या स्मरणपत्रात नमूद केले आहे. वरळी पोलीस कॅम्पच्या पुनर्विकासाबाबत 10 जुलै 2026 रोजी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले होते. उपलब्ध एफएसआयचा नियोजनबध्द वापर करून कार्यरत पोलिसांबरोबरच निवृत्त पोलिसांनाही तिथे परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. त्यावर महिना उलटला तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

उच्चस्तरीय बैठक बोलवा

या विषयासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलवावी. त्या बैठकीला पोलिसांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस कुटुंबियांनी स्थापन केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.