
महाराष्ट्रात पाच वर्षात 36 हजार 211 कंपन्यांना टाळे लागले आहे, या कंपन्या व कामगारांची एकत्रित माहिती सरकारकडे नाही, अशी माहिती संसदेत शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारनेच दिली. राज्यात उद्योगांची भरभराट होत असल्याचा राज्य सरकारचा दावा केंद्र सरकारनेच पह्ल ठरविला आहे.
राजाभाऊ वाजे यांनी संसदेत बंद पडलेल्या कंपन्या, तेथील विस्थापित कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्राने दिलेली माहितीच उद्योगधोरणाबाबत सरकार किती गंभीर आहे याची पोलखोल करून गेली. यानुसार पाच वर्षांत राज्यात 36 हजार 211 खासगी कंपन्या विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत. त्यात मुंबई शहरातील सर्वाधिक 12 हजार 9, पुण्यातील 6 हजार 433, ठाणे येथील 4 हजार 704, नागपुरच्या 1 हजार 478, नाशिकच्या 840, रायगड- 822, छत्रपती संभाजीनगर- 654, अहिल्यानगर- 308, जळगाव- 215, सातारा- 196 कंपन्यांचा समावेश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
किती कामगारांना फटका हे अनुत्तरीतच
कंपन्या बंद झाल्याने किती कामगार बेरोजगार झाले, त्यापैकी किती जणांना भविष्य निर्वाह निधी, उपदान, थकीत वेतन देणे आहे, याची एकत्रित माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे उद्योग धोरण आणि कामगार हिताबाबत सरकार किती बेफिकीर आहे, हेही समोर आले. प्रभावित कामगारांच्या पुनर्वसनासाठी काय योजना आहे, याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. कंपन्या बंद झाल्याने प्रभावित कामगारांची माहिती मंत्रालयाकडे ठेवली जात नाही, कंपनी दिवाळखोरीत गेली तर कामगारांचे दावे कायदेशीर प्रक्रियेत हाताळले जातात, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष किती कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, हे अनुत्तरीतच आहे.
नाशिकमध्ये 840 उद्योग बंद
नाशिक हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या घोषणा सरकार करीत आले आहे. मात्र, पाच वर्षात येथील 840 कंपन्या बंद झाल्या आहेत. पुण्या-मुंबईपाठोपाठ टाळे लागलेल्या कंपन्यांची संख्या नाशिकमध्ये जास्त आहे. हा नक्की कुठल्या स्वरुपाचा विकास आहे, असा सवाल केला जात आहे.
शहर कंपन्या
मुंबई 12,009
पुणे 6,433
ठाणे 4,704
नागपूर 1,478
रायगड 822
छत्रपती संभाजीनगर 654
नाशिक 840
अहिल्यानगर 308
जळगाव 215
सातारा 196
घोषणा करण्यापेक्षा सध्याचे उद्योग टिकवा
5 वर्षांत नाशिक जिह्यात 840 कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामागील कारणे काय आहेत, कितीजण बेरोजगार झाले आहेत, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. केवळ नवे उद्योग आणण्याच्या घोषणा करू नयेत, तर सध्याचे उद्योग कसे टिकतील हे बघावे, असे राजाभाऊ वाजे यांनी नमूद केले.
































































