
सायनच्या प्रतीक्षा नगर येथे रघुनाथ विठ्ठल चव्हाण उद्यानातील शेड (सिमेंट स्लॅबचे छत) कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले. जखमींना शीव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
बुधवारी दुपारी पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली. काही स्थानिक नागरिक शेडखाली बसले होते. अचानक कमकुवत झालेली शेड कोसळली. या दुर्घटनेत काही ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्याला इजा झाली.
अचानक मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी नागरिकांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच रावळी कॅम्प वडाळा फायर ब्रिगेड, पालिका अधिकारी घटनास्थळी आले. शेड कोणत्या कारणाने कोसळली याची पाहणी केली. घोंडीराम घोपकर (६५), गणपत आंबोले (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलिया (६५) आणि सुनीता मोरे (६४) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शिवसेना मदतीला धावली
रघुनाथ चव्हाण उद्यानातील घटनेची माहिती मिळताच मदतकार्यासाठी शिवसैनिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सुखरूप बाहेर काढून त्यांना शीव रुग्णालयात सुखरूप दाखल केले. या वेळी विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, विधानसभा समन्वयक रणजित चोगले, शाखाप्रमुख विनोद मोरे उपस्थित होते.





























































