
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील फसवणुकीचा खटला मागे घेण्याचा अमेरिकेच्या न्याय विभागाचा निर्णय (डीओजे) संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फेडरल कोर्टाचे न्यायाधीश निकोलस गाराफिस यांनी निकालपत्रातच डीओजेच्या भूमिकेवर टीका केली आहे. हा निर्णय घेताना झालेली अनियमितता चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डीओजेच्या सूचनेनुसार, फेडरल कोर्टाने अदानी यांच्याविरुद्धचा फसवणुकीचा खटला मागे घेतला आहे. या प्रकरणाच्या 47 पानी निकालपत्रात न्यायाधीश गाराफिस यांनी अदानींना आरोपमुक्त करण्याच्या ‘डीओजे’च्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. अमेरिकेत गुंतवणूक करण्याच्या अदानींच्या निर्णयाचा या खटल्याशी संबंध नसल्याचे डीओजेचे वरिष्ठ अधिकारी मॅककॉटर्स यांनी कोर्टाला कळवले होते. मात्र, हा निर्णय मॅककॉटर्स यांनी केवळ बचाव पक्षाच्या वकिलांशी चर्चा करून घेतला. घोटाळ्याचा तपास करणाऱ्या यंत्राणांशी सल्लामसलत केली नाही. ही बाब साधीसुधी नसल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.
एफसीपीए प्रकरणातील आरोप अद्याप कायम
न्यूयॉर्कच्या ‘ईस्टर्न डिस्ट्रिक्ट’ न्यायालयाने अदानीवरील रोखे आणि फसवणुकीशी संबंधित तीन आरोप रद्द करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लाचखोरी आणि न्यायदानात अडथळा आणण्याशी संबंधित फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (एफसीपीए) खालील आरोप रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. हे आरोप रद्द का करावेत याच्या कारणांसह ठोस पुरावे सादर करा, असे कोर्टाने डीओजेला सांगितले आहे.
































































